महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा फुले नावाने प्रसिद्ध असलेले जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव फुले(जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०), हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.
'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही (२०२० साली) त्यांची ही ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
शैक्षणिक कार्य
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्त्तराती मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.
सामाजिक कार्य
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते.
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्त्वाची वचने लीहिली.
सत्यशोधक समाज
२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.
लेखन साहित्य
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.
रा.ना. चव्हाण यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.
सन्मान
- महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या जीवन-कार्यावर आधारित, नाटक "मी जोतीराव फुले बोलतोय ..!" ...याची सुरुवात २००२पासून पुण्यातून झाली. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार आणि निर्माते सिद्धार्थ सीताराम मोरे हे आहेत तसेच महात्मा जोतिराव फुले यांची प्रमुख भूमिका सुद्धा सिद्धार्थ मोरे यांनीच साकारली आहे. तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया सिद्धार्थ या आहेत. हे नाटक मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये सादर केले जाते. हे नाटक संपूर्ण देशभर देखील सादर झाले आहे. सन २०१० साली या नाटकाचा पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे ७५० वा प्रयोग सादर झाला.
- पिंपरी-चिंचवड महापालिका ही 'फुले आणि आंबेडकर' यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करते.
- जोतीबा फुले यांच्या आयुष्यावर इ.स. १९५५ साली आचार्य अत्रे यांनी 'महात्मा फुले’ नावाचा चित्रपट काढला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.
- जोतिबांच्या जीवनावर 'असूड’ नावाचे एक नाटक डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिले आहे. या नाटकाचे रंगभूमीसाठी दिग्दर्शन बी. पाटील यांनी केले आहे.
- ‘सत्यशोधक' नावाचा एक मराठी चित्रपट, दिग्दर्शक नीलेश जालमकर काढणार होते. त्यात संदीप कुलकर्णी महात्मा फुले यांची आणि सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री राजश्री देशपांडे साकारणार होत्या. समता फिल्म्सचा हा चित्रपट २०१५ सालापासून रखडला.
- महाराष्ट्रातले भाजप सरकार आणि केंद्र सरकार फुलेंच्या जीवनावर एक चित्रपट काढणार असल्याचे जाहीर झाले होते, पण फेब्रुवारी २०१७ नंतर त्या चित्रपटासाठी काही झाल्याचे दिसले नाही.
- जोतीराव फुल्यांच्या गावी म्हणजे खानवडी येथे, दरवर्षी महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन भरते. याशिवाय फुले-आंबेडकर साहित्य संमेलन, फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन, सावित्रीबाई फुले साहित्य संमेलन आदी अनेक दलित साहित्य संमेलने फुले यांच्या नावाने भरतात.
- महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा