प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात.[१] आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत. त्यांचा जन्मदिवस आंबेडकर जयंती सुद्धा दरवर्षी भारतात साजरी केली जाते.
सुरुवातीचे जीवन
मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यामधील महू या लष्करी छावणी असलेल्या गावात झाला. त्यांचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच भीम, भीमा व भीमराव नावानेही कुटुंबिय व शेजारी लोक त्यांना हाक मारत. भीमराव आई-वडिलांचे १४वे अपत्य होते. त्यांचे कुटुंब त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार जातीचे आणि मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबडवे गावचे होते. (आंबडवे या गावचा अंबावडे असा चूकिचा उल्लेख पूर्वी अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.)[४][५][६] भीमरावांचे वडीलही ब्रिटिशांच्या भारतीय सेनेत नोकरी करत होते आणि तेथे त्यांनी मराठी व इंग्रजी भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. इ.स. १८९६ मध्ये अवघ्या ५ वर्षीय भीमरावांच्या आई भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आत्या मीराबाईंनी केले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे ‘कॅम्प दापोली’ येथील शाळेत त्यास प्रवेश देता आला नाही. यामुळे घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करावी लागली. इ.स. १८९६ मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली व ते सातारा येथे सुरुवातीला एका साधारण घरात राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील ‘कॅम्प स्कूल’ मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. बाबासाहेबांचे मूळ गाव कोकणातील आंबडवे व मूळ आडनाव सकपाळ होते. कोकणामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी (उपसर्ग) कर शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव सकपाळ असतांना त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांनी साताऱ्यातील गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल) मध्ये ‘आंबडवेकर’ असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (अनेक ठिकाणी या आडनावाचाही अंबावडेकर असा चूकीचा उल्लेख केलेला आहे[७] साताऱ्याच्या या शाळेत बाबासाहेबांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे देवरूखे ब्राह्मण शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावाचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमाला सुचविले. तेव्हा त्याला बाळ भीमाने लगेच होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे 'आंबेडकर' झाले. अशा प्रकारे भीमरावांच्या शिक्षणाचा आरंभ झाला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात १८-१८ तास अभ्यास करत असत.[८]
पिता रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि हे कुटुंब मुंबईला नेले. तेथे भीमराव हे एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील विद्यार्थी बनले.[९] कबीर पंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. चौथीची परिक्षा पास झाल्यावर त्यांना दादा केळूस्कर गुरूजींनी स्वत: लिहिलेले ‘भगवान बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक भेट म्हणून दिले.[१०] रामजी बाबांना इतर जातींतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकण्यासाठी त्यांना आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. जरी शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. इ.स. १९०७ साली तरूण भीमरावांनी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली. त्यावेळी एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. इ.स. १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. शाळेत असतानाच इ.स. १९०६ मध्ये त्यांचे लग्न दापोलीच्या ९ वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर झाले होते. पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आनि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी त्यांना यशवंत हा मुलगा झाला. त्याच सुमारात २ फेब्रुवारी, इ.स. १९१३ मध्ये त्यांचे आजारी वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चारच महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन, अमेरीकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले.
उच्च शिक्षण
बाबासाहेब आंबेडकरांचे आपले उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, बॉन विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन या संस्थांमधून घेतले आहे. त्यांनी इ.स. १९१२ मध्ये बी.ए., इ.स. १९१५ मध्ये दोन वेळा एम.ए., इ.स. १९१७ मध्ये पी.एचडी., इ.स. १९२१ मध्ये एम.एस्सी., इ.स. १९२२ मध्ये बार-ॲट-लॉ, इ.स. १९२३ मध्ये डी.एस्सी., इ.स. १९५२ मध्ये एल्एल.डी., इ.स. १९५३ मध्ये डी.लिट पदव्या मिळवल्या.
मुंबई विद्यापीठ
भीमराव आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची परीक्षा दिली. जानेवारी १९१३ मध्ये ते बी.ए. च्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. तत्पूर्वी जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारा अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला.
कोलंबिया विद्यापीठ
महाराज बडोदा संस्थान त्यांच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. महाराज सयाजीराव गायकवाड भीमरावांच्या इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वावर प्रसन्न होते. महाराजांनी, भीमरावांना होकार दिल्यामुळे ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशात अभ्यास करण्यासाठी चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करारपत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत १५ जून १९१३ ते १४ जून १९१६ पर्यंत एकूण तीन वर्षांची होती. त्यानंतर बोटीने प्रवास करून भीमराव आंबेडकर २० जुलै १९१३ रोजी दुपारी १२ वाजता अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे पोहचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये अर्थशास्त्र शाखेत त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला. त्यांनी या विद्याभ्यासाकरता प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर विषय म्हणून समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान हे विषय निवडले.
कोलंबिया विद्यापीठाला दि. १५ मे १९१५ रोजी ‘अॅडमिशन अँड फायनान्स ऑफ इस्ट इंडिआ कंपनी’ हा प्रबंध सादर केला. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए. पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया विद्यापीठाच्या ग्रंथालयात लाला लजपतराय यांच्याशी भीमरावांची ओळख झाली.
प्रा. सेलिग्मन आंबेडकरांचे पी.एच.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते. कोलंबिया विद्यापीठातील वास्तव्यानंतरही अनेक वर्षं प्रा. सेलिग्मन यांच्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घनिष्ठ संबंध जोपासला होता.[११]
‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ (The National Divident of India : A Historical And Analytical Study) हा भीमराव आंबेडकरांचा पीएच.डी. साठीचा विषय होता. त्यांनी इ.स १९१३ ते इ.स. १९१७ या कालावधीत विद्याभ्यासाच्या लिहिलेला हा प्रबंध लिहिला. ब्रिटिश साम्राज्यशाहीचे भारत सरकार हजारो मैल दूर असलेल्या ब्रिटिश पार्लमेंटमधील सेक्रेटरी ऑफ स्टेट (भारतमंत्री) यांच्यामार्फत कसा कारभार करत होते आणि त्यामुळे चाललेली सरकारी उधळपट्टी आणि बेजबाबदारपणा भारतीय जनतेस कसा पिळून काढत होता यावर प्रकाश टाकला तसेच अंदाजपत्रक प्रथम कधी आले, प्रांतिक अर्थव्यवस्था केव्हापासून सुरू झाली, अर्थव्यवस्थेचा विस्तार कसा झाला याचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. जगात निरनिराळ्या देशातील नागरिकांना ज्या अनेक प्रकारच्या करांचे ओझे वहावे लागते त्याचा उल्लेख करून ब्रिटिश साम्राज्यशाही केंद्र सरकारचे कर, स्थानिक स्वराज्यसंस्थांचे कर तसेच प्रांतिक सरकारचे कर याची छाननी त्यावेळच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून केली. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे इ.स. १९२५ मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला मात्र यावेळी ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ असे करण्यात आले. हा ग्रंथ लंडनच्या प्रकाशकाने प्रसिद्ध केला. डॉ. भीमराव आंबेडकरांनी आपल्याला उच्चशिक्षणासाठी मदत केल्याबद्दल बडोदा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांना हा ग्रंथ अर्पण केला.[१२]
९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक डॉ. ए.ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला नवीन शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली. त्यानुसार भारतातील जाती : त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी हा शोधनिबंध वाचला. कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जॉन ड्युई यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच बाबासाहेब आंबेडकरांनी 'स्वातंत्र्य, समता आणि बंधुता' तत्वांचा प्रथम अनुभव घेतला. “कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले.”, असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. आंबेडकरांनी ३ वर्षांसाठी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा वापर करून अमेरिकेतील अभ्यासक्रम केवळ २ वर्षांतच पूर्ण केला आणि इ.स. १९१६ मध्ये लंडनला गेले.
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन
इ.स.१९१६ मध्ये डॉ. बाबासाहेब लंडनला आले. अर्थशास्त्रात पदवीसाठी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मास्टर ऑफ सायन्ससाठी आणि डॉक्टर ऑफ सायन्ससाठी प्रवेश घेतला. कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर व्हावे, अशी महत्त्वाकांक्षा बाळगत त्यांनी "ग्रेज इन्" येथे प्रवेशासाठी अर्ज केला. परंतु त्यांच्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपल्यामुळे बाबासाहेबांना भारतात परतावे लागले. बडोदा संस्थानच्या करारान्वे त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरीचा स्वीकार केला. पुढे ते मुंबई येथे सिडनहॅम कॉलेजमध्ये ‘राजकीय अर्थशास्त्र’ शिकवण्यासाठी जाऊ लागले. व पुन्हा लंडनला जाण्याची तयारी केली. डॉ. बाबासाहेब ५ जुलै १९२० रोजी अभ्याक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन लंडनला गेले. ३० सप्टेंबर १९२० रोजी त्यांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत मास्टर ऑफ सायन्स साठी प्रवेश मिळवला तसेच ग्रेज-इन या संस्थेत नाव दाखल करुन बॅरिस्टरीचा अभ्यास सुरु केला, वर्षभरात त्यांनी शोधप्रबंध तयार केला. ‘प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स’ प्रबंध लंडन विद्यापीठाने स्विकारून २० जून १९२१ रोजी त्यांना मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संख्येने त्यांना बार-ॲट-लॉ (बरिस्टर-ॲट-लॉ) ही वकिलीची पदवी प्रदान केली. त्यानंतर ‘द प्रोब्लम ऑफ रुपी’ हा प्रबंध तयार करून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ (डी.एस्सी.) या पदवीसाठी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. लंडन विद्यापीठात प्रबंध सादर केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जर्मनी येथे गेले. तेथील बॉन विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त करण्यासाठी प्रवेश घेतला. तेथे तीन महिने राहिले आणि तद्नंतर त्यांचे शिक्षक एडवीन कॅनन यांनी बाबासाहेबांना लंडनला येण्यासंबंधी पत्र पाठवले. ते लंडनला परतले व पुढे नोव्हेंबर १९२३ मध्ये त्यांना लंडन विद्यापीठा कडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी बहाल केली. इंग्लंड येथील प्रकाशकांनी "ब्रिटीश भारतातील प्रांतीय आर्थिक उत्क्रांती"हा प्रबंध प्रशिद्ध केला. या संशोधनामुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले. विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिण्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला. या साठी त्यांना २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.
महापरिनिर्वाण
नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर इ.स. १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.
डॉ. आंबेडकरांची अंत्ययात्रा राजगृह (हिंदू कॉलनी), दादरवरून १.४० वाजता निघाली. दादर व्हिन्सेन्ट रोड (आताचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड), पोयबावडी, परळ, एलफिन्स्टन ब्रिज, सयाी रोड, गोखले रोड (उत्तर व दक्षिण), रानडे रोडवरून दादर चौपाटीवरील हिंदू स्मशानभूमीत (आता चैत्यभूमी) सायकांळी ६ वाजता पोहोचली. अंत्ययात्रेत देशभरातून १५ लाखांवर लोक दु:खित अंत:करणाने सामील झाले होते. ७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते आणि तिला दादरमधील ‘राजगृह’या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहराने पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती. त्यानंतर दहनसंस्कारास उपस्थित राहिलेल्यापैंकी एक लाख लोक त्यांच्या अस्थींबरोबर तैनातीने राजगृहापर्यंत गेले. परंतु दहनभूमी सोडण्यापूर्वी त्यांनी बाबासाहेबांच्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी म्हणून बौद्ध धम्माचा स्वीकार करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार तत्क्षणी दीक्षा समारंभाचा कार्यक्रम होऊन तेथे उपस्थित असलेल्या बौद्ध भिक्खूंपैकी महापंडित डॉ. आनंद कौशल्यायन यांनी त्रिशरण व पंचशील देऊन त्याच ठिकाणी १० लाख लोकांना बौद्धधम्माची दीक्षा दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा